तडीपार आरोपीची थेरगावात दहशत; पोलिसांनाही धक्काबुक्की

126

थेरगाव, दि. १३ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीने विनापरवाना शहरात येऊन दहशत माजवली. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील आरोपीने धक्काबुक्की केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

प्रतीक अंतवान पवार (वय 20, रा. गुरूनानकनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक एन बी गेंगजे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी प्रतिक पवार याला मार्च 2020 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. तो बुधवारी (दि. 12) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास बापूजीबुवानगर, थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ त्याने दहशत माजवीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांचा शर्ट धरून धक्काबुक्की केली. याबाबत त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare