डॉ. प्रितम मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडेंची पत्नी राजश्री रिंगणात ?

123

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीत शोधाशोध सुरू आहे. त्यातच प्रितम यांच्याविरोधात विधान परिषदेचे   विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी  राजश्री यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीला बीडचे प्रमुख पदाधिकारी  उपस्थित  होते. यावेळी बीड मतदारसंघातून राजश्री मुंडे यांचे नावांवर चर्चा करण्यात आली. मात्र, धनंजय मुंडे यांनी पत्नीने उमेदवारी करण्याबाबत होकार दिलेला नाही.

प्रितम मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी मुंडे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या राजश्री यांचे नांव समोर आले आहे. त्यांचा राजकारणाशी  तसा जवळचा संबंध नाही, मात्र, त्या जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचारात भाग घेत असतात.