डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी

172

पुणे, दि. १९ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंधुरे याला ७ दिवसांची म्हणजे २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज (रविवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची सीबीआयच्या विशेष न्यायालयात  सुनावणी झाली.

न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी त्याला ७ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. सचिन अंधुरे हा प्रत्यक्ष मारेकरी आहे, त्याच्याकडून हत्यार आणि वाहन ताब्यात घ्यायचे आहे. त्याने ट्रेनिंग कुठे घेतली, कोणी त्याला ट्रेनिंग दिली होती याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर येऊ शकते त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली होती.

दरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघेही औरंगाबादचे असून दोघेही चांगले मित्र आहेत. यामुळे काही म्हत्वाचे खूलासे समोर येऊ शकतात त्या दिशेने सीबीआय तपास करत आहे.

मात्र, माझ्या भावावरील आरोप चुकीचे असून त्याला याप्रकरणात फसवले जात आहे असा आरोप सचिनचा भाऊ प्रवीण अंधुरे याने केला आहे.