डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली – संभाजी भिडे

36

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधाने करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असे विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचे कौतुक केले होते हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिले असा दावा भिडेंनी केला. तसेच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिले मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिले असेही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असे भिडे म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केले आणि मिलिंद एकबोटेंचे समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असेही ते म्हणाले.