डेटिंग साईटवरील तरुणीला भेटायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची ऑस्ट्रेलियात हत्या

296

मेलबर्न, दि. २६ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑनलाईन डेटिंग साईटवर ओळख झालेल्या तरुणीला भेटायला गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२३) घडली.

मौलिन राठोड (वय २५, स.रा. रा. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, मु.रा. अहमदाबाद) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मेलबर्न पोलिसांनी याप्रकरणी एका १९ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलिन चार वर्षांपूर्वी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. तो अकाऊंटस् मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिथे गेला होता. सोमवारी रात्री मौलिन डेटिंग साईटवर ओळख झालेल्या तरुणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. काही वेळाने पोलिसांना फोन वरून मौलिन जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मौलिनला रुग्णालयात दाखल केले. मौलिनला गंभीर दुखापत झाली होती. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मौलिनचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी त्याच्या मित्रांनी पैसे गोळा केले असून लवकरच त्याचा मृतदेह भारतात आणण्यात येईल. मौलिनच्या मृत्यूचे वृत्त समजताच भारतात राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांना मानसिक धक्का बसला आहे.