डी.एस.कुलकर्णी प्रकरण: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय

28

पुणे, दि. २५ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालय मंगळवारी (दि.२६) निर्णय देणार आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवींद्र मराठे यांना अटक केली असून मराठे यांच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मराठे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून आरबीआय अॅक्टमधील कलम ५८ ई नुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाला अटक करण्यापूर्वी परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांना ठेवीदारांकडून पैसे गोळा केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक करणे या कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई योग्य नाही, असे मराठे यांच्यावतीने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते.

आज सोमवारी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालय जामीन अर्जावर उद्या मंगळवारी निर्णय देणार आहे.