डिजिटल उपकरणांच्या आहारी जाण्यामध्ये भारतीय ग्राहकांचा दुसरा क्रमांक

59

मुंबई, दि,१३ (पीसीबी) – भारतीय नागरिक मोबाइलचा वापर केल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नसल्याचे वास्तव डिजिटल कंटेंट वितरणामधील जागतिक कंपनी असणाऱ्या ‘लाइमलाइट नेटवर्क्स’ ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्स’ या अहवालातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण भारतीय ग्राहकांपैकी दोन-तृतीयांश ग्राहकांनी एक दिवसही मोबाइलविना राहू शकत नसल्याचे मान्य केले आहे. डिजिटल उपकरणांच्या आहारी जाण्यामध्ये भारतीय ग्राहकांचा मलेशियानंतर दुसरा क्रमांक लागतो.

या सर्वेक्षणात १० देशांतील मोबाइल ग्राहकांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामध्ये डिजिटल मीडियाचा त्यांच्याकडून होणारा वापर आणि त्यांच्या जीवनातील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत विचारण्यात आले. मजेशीर बाब म्हणजे आवडत्या डिजिटल उपकरणांना किती वेळ दूर ठेवू शकता, असे विचारले असता ६६ टक्के भारतीयांनी एक दिवसही नाही, असे उत्तर दिले. त्या तुलनेत मोबाइल फोनला किमान एक दिवस दूर ठेवणे शक्या आहे, असा दावा करणाऱ्यांचे प्रमाण ४८ टक्के आहे. डिजिटल तंत्रज्ञान हाताळण्यासाठी लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा वापर करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण मोठे असल्याचेही दिसून आले आहे. ४५ टक्के सहभागींनी आपण एक दिवसही लॅपटॉप आणि डेस्कटॉपविना राहू शकत नसल्याचे म्हटले आहे.