डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसह ३२७ औषधांवर बंदी

497

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – केंद्र सरकारने डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या ३२७ औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्डाने (डीटीएबी) केली होती. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे  या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी घालण्यात आली आहे.  मात्र, या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली. अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसी  औषधांवर बंदी आहे. भारतासह इतर काही देशांमध्ये या औषधांची विक्री केली जात आहे. भारतातील पड्डुचेरी या  एकमेव राज्याने या औषधावर बंदी घातली आहे.

भारत सरकारने ज्या ३२७ औषधांवर बंदी घातली आहे. त्याचा भारतातील व्यवसाय ३ हजार ८०० कोटी रूपयांचा आहे. भारताच्या औषध क्षेत्रातील  तीन टक्के हा व्यवसाय आहे. भारत सरकारच्या या निर्णयचा फटका फायझरच्या ३०८ कोटी रूपयांच्या व्यवसायाला बसणार आहे. तर एबॉटच्या ४८० कोटी,मॅक्सिऑड्स ३६७ कोटी, पॅनडम २१४ कोटी, सुमो ७९ कोटी आणि जिरोडॉला ७२ कोटी रूपयांचा फटका बसणार आहे.