डान्सबारमधील बारबालांच्या नृत्यांमध्ये अश्लील काय?- सर्वोच्च न्यायालय

454

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – डान्सबारमधील बारबालांच्या नृत्यांमध्ये अश्लील काय असा सवालच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. फक्त अश्लीलतेचे कारण देऊन डान्सबारना परवानगी नाकारणे चुकीचे असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

मुंबईतील डान्सबारवर सरकारने लादलेल्या निर्बधांविरोधात बारमालकांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या डान्स बारसंबंधित धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डान्स बारमधील नृत्य सामाजिकदृष्ट्या अश्लील असल्याचा युक्तीवाद राज्य सरकारने केला होता. यावर कोर्टाने ताशेरे ओढले.

‘ अश्लीलतेची कल्पना सदासर्वकाळ सारखी नसते. ती काळासोबत बदलत असते. पूर्वी चित्रपटांमधील जी दृश्य लोकांना अश्लील वाटायची आता ती तितकीशी अश्लील वाटत नाहीत. त्यामुळे बारबालांची नृत्य सरसकटपणे अश्लील आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. अश्लीलतेमुळे डान्स बारला परवानगी नाकारणं योग्य नाही’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. याआधीही केरळ हायकोर्टाने अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते असा निकाल एका खटल्यात दिला होता.