डांगे चौकातील मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेतीन लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

77

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तब्बल दोन लाख ८८ हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकात असलेल्या शिवम मोबाईल नावाच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकान मालक जबरराम नवाराम प्रजापती (वय २९, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रजापती यांचे डांगे चौकात शिवम मोबाईल नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता प्रजापती यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून तब्बल दोन लाख ८८ हजार रुपयांचे २८ मोबाइल चोरून नेले. त्यांनी तातडीने वाकड पोलिसांकडे धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली. वाकड पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.