ठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

343

ठाणे, दि. ९ (पीसीबी) – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर मिरारोड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज (गुरूवार) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद कौस्तुभ राणे अमर रहे…’, ‘भारत माता की जय…’, अशा घोषणा करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.   

राणे यांचे पार्थिव सकाळी सहाच्या सुमारास मिरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्ययात्रेतही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. सरकारच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

राणे यांचे पार्थिव बुधवारी रात्री दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. आज (गुरुवारी) सकाळी लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव मालाडकडे नेण्यात आले. मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले . त्यानंतर येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. मेजर कौतुभ राणे अमर रहे… अमर रहे.. अशा नागरिकांनी घोषणा दिल्या.