ठाणे हिंसाचार : शिवसेना नगरसेविकेच्या पतीसह ३६ जण अटकेत

282

ठाणे, दि. २७ (पीसीबी) – ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३६ जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे.

मराठा मोर्चादरम्यान ठाण्यात बुधवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्याचे व्हिडीओ, सीसीटीव्ही फूटेज आणि फोटोच्या मदतीने हिंसक आंदोलन करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई केली. आजच्या दिवसात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. हिंसाचार करणाऱ्या अनेक जणांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा पोलिस करत आहेत.

ठाण्यातील शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नौपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली असून कापुरबावडी, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलिसांनी १३ जणांवर कारवाई केली आहे.

दुसरीकडे, नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या ५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.