ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये आज शाळा बंद; मुंबईतही अनेक शाळांना सुट्टी

24

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यातील शाळांना आज (गुरुवारी) सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबईत शिक्षण विभागाने अधिकृतपणे शाळा बंद करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी शाळा प्रशासनानेच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सकल मराठा समाज महाराष्ट्र’तर्फे गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईला या बंदमधून वगळण्यात आले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा किंवा महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरात शिक्षण विभागाने अधिकृतपणे शाळा बंद करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी शाळा प्रशासनाने स्वत:हूनच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी शाळा प्रशासनाने गुरुवारी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली. महाविद्यालये व शाळा त्यांच्या विभागातील परिस्थिती पाहून त्यांच्या स्तरावर सुट्टीचा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश पालकर यांनी दिली.

ठाणे, औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे.