ठाकरे – फडणवीस फोनबाबत शिवसेनेकडून इन्कार

40

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंना भाजपाच्या श्रेष्ठींसोबतही संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आहे. दरम्यान यावर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या निव्वळ भूलथापा असल्याचा सांगितलं आहे.

“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये,” असं आवाहन शिवसेनेकडून कऱण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री तेव्हाच राजीनामा देणार होते, पण…

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे सोमवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखलं अशी सूत्रांची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करण्याआधी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळेच उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह अर्धा तास उशिरा सुरु झालं असं कळत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमध्ये मी मुख्यमंत्री नको असल्यास समोर येऊ सांगावं, पद सोडेन असं आव्हान दिलं होतं. तसंच त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडला आणि मातोश्रीवर राहण्यास गेले. आपण मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडला आहे, पण जिद्द नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.