“ठरल…आता प्रचाराचा मुद्दा भाजपाचा भ्रष्टाचार”– थर्ड आय – अविनाश चिलेकर 

169

‘कर्माचा सिध्दांत’ हे हिंदुत्ववादी विचारांचे ठक्कर बापू यांचे पुस्तक किमान राजकिय मंडळींनी जरूर वाचावे. चांगली कर्म केली की त्याचे फळ चांगलेच मिळते आणि दुष्कर्म केली तर वाईट. देव, देश, धर्माच्या गोष्टी करून राजकारण करणाऱ्या मंडळींनाही हा सिध्दांत लागू आहे. २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. दादांनी सलग २० वर्षे निर्धोक राज्य केले. राष्ट्रवादीचा भ्रष्ट्राचाराच्या पापाचा घडा भरला. लोकांनी एकदम किरकोळ पण भावनिक मुद्यावर राष्ट्रवादीची सत्ता घालवली. विठ्ठल-रुक्मिनी मूर्ती १४०० रुपयांची ३९०० रुपयांना खरेदी करून भ्रष्ट्राचाराचा कळस केला होता तो जनतेला खुपला. मोदी आणि फडणवीस यांच्याकडे पाहून कष्टकऱ्यांनी पाच वर्षांसाठी भाजपाला सत्तेत बसवले. अजित पवार यांच्या स्वप्नातसुध्दा नसेल ते इथे घडले होते. नंतर पाच वर्षांत भाजपानेही भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला, अगदी कहर झाला. सत्यवचनी भाजपाचे लायसन्स घेऊन कातडी पांघरलेल्या काही भुरट्यांनी अक्षरशः लूट केली. राष्ट्रवादीला २० वर्षांनी लोक कंटाळले होते, पण भाजपाबाबत अवघ्या पाच वर्षांत नको नको झाले. वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते, त्यामुळे तमाम विरोधक आणि सामान्य जनतासुध्दा भाकरी फिरवण्याच्या विचाराप्रत आली आहे. गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी शहराचा दौरा केली. भाजपा आमदारांनी मॉल उघडल्याची घनाघाती टीका त्यांनी केली आणि जनतेची या भ्रष्ट्र राजवटीतून सुटका कऱण्याचे आवाहन त्यांनी केले. पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी त्याच दरम्यान एक ट्विट केले आणि भाजपाचा भ्रष्टाचार खोदून काढण्याची वल्गना केली. त्यांचे आजोबा शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा भाजपाचा भ्रष्टचार हाच मुद्दा पकडला आणि लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजुला करा, असे जाहीर आवाहन केले. बुधवारी (दि.२०) महापालिकेची सर्वसाधारण सभा याच मुद्यावर गाजली. स्मार्ट सिटीमधील २५० कोटींच्या एल. एन्ड टी. कंपनीला दिलेल्या कामात किती घोळ आहे ते सिमा सावळे यांनी मांडले आणि भाजपासह जवळपास सर्व राजकिय पक्षांचे नगरसेवकांनी होय, यात भ्रष्टाचार झाला हे मान्य करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. सलग पाच तास चाललेल्या याच सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचाराचा धाका पकडून सार्वजनिक पैशाची लूट करणाऱ्या भाजपावर जोरदार प्रहार केला. तिकडे शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनीही स्मार्ट सिटीत ५००-६०० कोटींचा गफला असल्याचा आरोप करून भाजपाचे ईडी, सीबीआय फेम खासदार किरीट सोमय्या यांना एक दोन पानी पत्र देत भाजपाची सत्ता असलेल्या या महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, असे आव्हानच दिले. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी दोन आमदारांची हुकूमशाही आणि गैरकारभाराचे वाभाडे काढत पंचनामा केला आणि घरचा आहेर दिला. गेले दोन महिने स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार असाच गाजतो आहे, वाजतो आहे. बातम्यांमधून भाजपाच्या अब्रुची लक्तरे पार वेशीवर टांगली जात आहेत. पण इतके हल्ले होऊनही भाजपामधून कधी प्रत्युत्तर अथवा स्पष्टीकरण, खुलासा आला नाही. याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरते आहे. भाजपाचे आमदार मूग गिळून बसलेत. आमदार महेश लांडगे यांनी मोठ्या साहेबांच्या टीकेवर उत्तर देण्या इतका मी मोठा नाही, असे म्हणत वेळ मारून नेली. भाजपावर चहुबाजुंनी हल्ले सुरू आहेत आणि नेते, पदाधिकारी अक्षरशः डोळे झाकून बसलेत. जर का हे आरोप खोटे असतील तर त्यावर खुलासा दिला पाहिजे, पण भाजपाची बोलती बंद आहे. त्यामुळे झालेले आरोप खरे आहेत, असा ठाम समज आता जनतेमध्ये झाला आहे. जर का असेच मत बनत गेले तर ते मतपेटीत परिवर्तीत होईल आणि भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावर भाजपाची सत्ता आरामात जाऊ शकते. ते पापकर्माचे फळ असेलं.

महापालिका सभेतील रनकंदन, काय सांगते…
महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गव्हाणे यांनी स्मार्ट सिटीतील एल.एन्ड टी कंपनीच्या २५० कोटींच्या कामाला तांत्रिक मान्यता नसल्याचा मुद्दा उचलला. तमाम जेष्ठ नगरसेवकांनी त्यावर भाषणे करत महापालिका प्रशासनाला ठोक ठोक ठोकले. निगरगट्ट प्रशासनाने स्मार्ट सिटी हा विशेष प्रकल्प असल्याने त्याला तांत्रिक मान्यतेची गरज नसल्याचे सांगत उघडपणे भ्रष्ट्र कारभाराचे समर्थन केले. आयुक्त राजेश पाटील यांच्या निष्पाप, नारागस, भाबड्या चेहऱ्यामागे भलतेच काहीतरी दडले आहे, त्याचे प्रथमच दर्शन झाले. महापालिकेतील किरकोळ कामालाही तांत्रिक मान्यतेची गरज लागते आणि इथे नाही. प्रत्यक्षात केंद्र सराकरच्या स्मार्ट सिटी नियमावलीत तांत्रिक मान्यतेची तरतूद स्पष्टपणे अधोरेखीत केली आहे. अशाही परिस्थितीत केवळ भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी प्रशासन किती खोटे बोलू शकते त्याचे प्रत्यंतर आले. अशाच पद्धतीने स्मार्ट सिटी मधील अन्य कामांमध्येही प्रचंड घोळ असल्याचा दाट संशय आहे. प्रशासनातील भ्रष्ट्र अधिकारी, काही राजकीय नेते, दलाल यांनी मिळून या वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. किमान ४००-५०० कोटी पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या खिशात गेलेत. आता चौकशी झालीच तर इथे ईडी, सीबीआय ला मोठे घबाड मिळेल. किरीट सोमय्या यांना राऊत यांनी पत्र दिले पण सोमय्या यांना इकडे लक्षा घालायला वेळ नाही. कारण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, हा भाजपाचा खाक्या आहे. राष्ट्रवादी, शिवेसना, काँग्रेसच्या तमाम नेते मंडळींनी आता स्मार्ट सिटी मधील भ्रष्ट्राचार, त्यातील सब कॉन्ट्रॅक्ट, कोट्यवधींची लूट, ठेकेदार, नेते, अधिकाऱ्यांचे संगनमत हे घराघरात पोहचवले तर भाजपाची तळी भरलीच समजा. महापालिका निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच हा मुद्दा तापत असताना भाजपा शांत बसल्याने एकदम ब्रकफूटवर गेली आहे. भाजपा निरुत्तर असल्याने हा मुद्दा परफेक्ट लागू पडतो हे विरोधकांनाही लक्षात आले. त्यामुळे आता प्रचाराचा हाच मुद्दा राहणार, हे आता सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

राष्ट्रवादीचे झाले तेच आता भाजपाचे होणार –
२०१७ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची आली. त्यावेळी केंद्रात मोदींची हवा होती. राज्यात फडणवीस यांची सत्ता होती. वाऱ्याच्या दिशाने तोंड फिरवणाऱ्या मतलबी राजकारण्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि भाजपाशी घरोबा केला. भाजपामध्ये घरात बसायला जागा नव्हती इतकी भरती झाली होती. आता वारे महाआघाडीच्या दिशाने वाहते हे लक्षात आल्यावर पुन्हा भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणाऱ्याचीही संख्या लक्षणीय आहे. जे जे राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे सोडून भाजपामध्ये आले आता त्यांची परत स्वगृही जाण्यी घाई दिसते. मुळात शहरात भाजपाचे कार्यकर्ते, मतदार तसे बोटावर माजण्याइतकेच होते. मोदींमुळे आणि नंतर महेश लांडगे, लक्ष्मण जगताप समर्थकांमुळे इथे भाजपाला सूज आली. राष्ट्रवादीतील नाराजांना पर्याय मिळाला. त्यावेळी दोन दोन खासदार असूनही ढेपाळलेल्या शिवसेनेची उदासीनताही भाजपाच्या पथ्यावर पडली. २०१७ पूर्वी वर्षभर जवाहरलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण योजनेतील (जेएनएनयूआरएम) झोपडपट्टी पुनर्वसनातील भ्रष्टाचारावर रान पेटले होते. त्यावेळी आरोपांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हलकेसे पाहिले म्हणून त्याचा फटका त्यांना बसला. आता स्मार्ट सिटीतील भ्रष्टराचारावर भाजपाच्या मुस्क्या आवळल्या आहेत आणि एकाही मुद्यावर भाजपाकडे उत्तर नाही. जे त्यावेळी राष्ट्रवादीचे झाले तेच आज भाजपाचे होते आहे. इतुहासाची पुनरावृत्ती होते ती अशी. जे पेरले तेच उगवले. भ्रष्टाचार पेरला भ्रष्टाचारच उगवला. पाहुण्यारावळ्यांनी पालिका कशी हडपली ते आता गल्लोगल्ली चर्चेत आहे. आमदारांनी आपल्याच भाच्यांना शेकडो कोटींची कामे दिली, असे भाजपाचेच लोक उघडपणे सांगतात. शहराची वाटणी दोन भागांत कशी झाली त्यावर खुद्द शरद पवार बोलतात. गाववाला आणि बाहेरचा या मुद्यावर इथल्या राजकारणाचा पिंड पोसला. आता शरद पवार यांनीही बदललेल्या परिस्थितीचे महत्व समजले म्हणून गावकीला विराम देण्याची भाषा ते बोलून गेले. पाच वर्षांत भाजपाची राष्ट्रवादी झाली म्हणून लोकांना आताची भ्रष्ट्र भाजपा नकोशी झाली. पापक्षालन अथवा शुध्दीकरण तीन महिन्यांत शक्य नाही आणि ती ताकदसुध्दा भाजपाच्या बोलघेवड्यांमध्ये नाही. ज्या रा.स्व.संघाच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी भाजपाला सत्ता दिली त्यांनीसुध्दा आता आपली बदनामी नको म्हणून भ्रष्ट्र कारभार पाहून या गलिच्छ राजकारणातून सरळ अंग काढून घेतले. भाजपाचे दोन आमदार प्रचंड दबावाखाली आहेत. आपण बुडत आहोत हे लक्षात आले तर प्रसंगी तेसुध्दा भाजपाला रामराण करतील अशीही वदंता आहे. थोडक्यात या परिस्थितीत कधी भाजपाचा सुपडा साफ होईल याचा फडणवीस यांनाही तपास लागणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते दोन-चार वेळा शहरात येऊन भाजपावर दुगान्या झाडून गेले, पण भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यायचे टाळत आहेत. यातून आणखी दुसराच अर्थ निघतो आहे. पवार- राऊत यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपाच्या सत्तेवर तोफा डागल्या. लढाईसाठी विरोधकांकडे यावेळी भरपूर दारूगोळा तयार आहे. दुसरीकडे भाजपाच्या ताब्यात किल्ला आहे आणि किल्ल्यात ना दारूगोळा ना कुठली रसद शिल्ल आहे. उलटपक्षी तिथला किल्लेदार कधी फितूर होईल याचीही शाश्वती नाही. घोडेमैदान जवळ आहे, पाहू या कुस्ती रंगती की नुरा कुस्तीवरच भागते.

WhatsAppShare