ट्राफिक पोलिसांकडे मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची गरज नाही; केंद्राचा आदेश

3763

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर किंवा एमपरिवहन अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रे जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्राफिक सिग्नल तोडणे तसेच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रे जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रे पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.