टाकवे बुद्रुकचा उपसरपंच खुनाचा सूत्रधार

225

टाकवे, दि. 26 (पीसीबी): मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील उद्योजक यश असवले या तरुणाचा खून राजकीय वर्चस्वातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या खून प्रकरणाचा कट रचल्याच्या आरोपावरून टाकवेच्या विद्यमान उपसरपंचास वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, वडगाव मावळ न्यायालयाने त्यास चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

प्रकरणातील  मुख्य सूत्रधार विद्यमान उपसरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने टाकवे बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंचानेच खुनाचा कट रचून पुतण्या व त्याच्या मित्रांकडून यश रोहीदास असवले (वय २२) याचा खून केला आहे, अशी माहिती माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणी खुनाचा मुख्य सुत्रधार टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचा विद्यमान उपसरपंच रोहीदास राघू असवले (वय ४२ रा.टाकवे) याला काल (रविवारी) अटक करण्यात आली. वडगाव न्यायालयात हजर केले असता 29 मेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी ऋतिक बाळू असवले (वय-20), अजय बबन जाधव (वय 24 दोघेही रा. टाकवे), अतिष राजू लंके (वय 21,रा वननगर,तळेगाव दाभाडे) विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय 23 रा. गुरूदत्त काॅलनी, वराळे रोड, तळेगाव), ऋतिक कांताराम चव्हाण (वय 19, रा. म्हाळसकर वाडा, वडगाव मावळ), अश्विन कैलास चोरघे (वय 22, रा. घोणशेत मावळ), निखिल भाऊ काजळे (वय 20, रा वडगाव मावळ) यांना अटक केली होती. तर रविवारी (दि 24) रात्री उपसरपंच रोहिदास राघू असवले याला अटक केली आहे.
ऋतिक बाळू असवले व त्याच्या मित्रांकडून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून करण्यात आला. या नंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात सात आरोपींना अटक केली. लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत काॅवत व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर  यांनी सोमवारी या घटनेतील अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उपसरपंच असल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. त्यांच्या कडून मोबाईल, तीन मोटारसायकल व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

WhatsAppShare