झेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा

265

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. ‘मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम?,’ असा सवाल करतानाच ‘ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनेे सरळ पायउतार व्हावे, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,’ असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.

मराठा मोर्चाने बुधवारी मुंबईत पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडणारे एक निवेदन काढून राज्यसरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘सरकारने वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरेच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचे धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरेच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात,’ अशी मागणी राज यांनी केली आहे.