ज्योतिरादित्य सिंधीया यांना धमकी; भाजप महिला आमदाराने मुलाला दिले पोलिसांच्या ताब्यात  

263

भोपाळ, दि. ४ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधीया यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रिन्सदिप खटीक या आपल्या मुलाला भाजपच्या आमदार उमा देवी खटीक यांनी स्वतःच पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. माझ्या मुलाचे वागणे चुकीचे होते. मी स्वतःच त्याला पोलिस ठाण्यात घेऊन आली आहे, असे उमा देवी खटीक म्हणाल्या.

प्रिन्सदिप लालचंद याने फेसबुकवर पोस्ट टाकून ज्योतिरादित्य यांचा एकेरी उल्लेख करत बुंदेलखंडच्या झाशीच्या राणीचा ज्याने खून केला. त्या जिवाजी रावचे तुझ्या अंगात रक्त आहे, जर तू हटा मध्ये प्रवेश करत उपकाशीला अपवित्र करण्याचा प्रयत्न केलास, तर गोळी झाडेन, एकतर तुझा मृत्यू नाहीतर माझा मृत्यू होईल, अशा शब्दांत धमकी दिली होती.

या कृतीवरून भाजपच्या नेत्यांची मानसिकता आणि पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया सिंधीया यांनी दिली. सिंधिया यांच्या येत्या ५ सप्टेंबरला हटा जिल्ह्यामध्ये एका जाहीर सभेचे आयोजन केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली होती.