ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

29

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी लोधी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी वार्तांकन तसेच स्तंभलेखन केले आहे. त्यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती. नय्यर यांचा जन्म पंजाबमधील सियालकोट येथे १४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली होता. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म असलेल्या नय्यर यांनीआणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला होता. मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे नय्यर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांची १९९० मध्ये ग्रेट ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदीही नियुक्ती करण्यात आली होती.