ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं निधन

80

पुणे, दि. २३ (पीसीबी) : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

शरद रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

शरदराव रणपिसे यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विविध विषयांवर त्यांची अभ्यासू मतं आणि मांडणी सातत्याने नवीन काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असायची. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक नेतृत्व गमाविल्याची भावना काँग्रेस पक्षातून व्यक्त होत आहे.

कोण होते शरद रणपिसे?
शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतलं. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचं वेड लागलं. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

बी कॉम पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं होतं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होत्या. विधिमंडळात अभ्यासू आणि संयमी भाषण करण्यात ते तरबेज होते. विविध विषयांवर काँग्रेसची बाजू ते मांडायचे. विधिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची.

महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिलं.

शरद रणपिसे यांनी भूषवलेली पदे
रामराज्य शिक्षण संस्था पुणे संस्थापक
उर्दू शिक्षण संस्था पुणे
काँग्रेस पक्षाचे सदस्य 1969
पुणे महापालिकेचे सदस्य 1979 ते 1985
गलिच्छवस्ती निर्मूलन, गृहनिर्माण व समाज कल्याण समितीचे अध्यक्ष 1983-1984
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ 1994-1995
पुणे शहर इंदिरा काँग्रेस पक्ष संस्थापक सदस्य 1978
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस 1973

WhatsAppShare