ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते ; एकनाथ खडसेंची खंत  

395

जळगांव, दि. ४ (पीसीबी) – ज्येष्ठत्वाचा विचार केला, तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते. मात्र,  पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रीपद हुकल्याची खंत बोलून दाखवली. भुसावळ येथील  आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांचा एलईडी पथदिव्यांबाबत करार करण्यात आला. त्यानंतर खडसे  पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी खडसे म्हणाले की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमच्या गटामध्ये चुरस असल्याचे माध्यमातून दाखवले जात आहे. मात्र, आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्यासर्वांचा मीच नेता आहे,  असे खडसे म्हणाले. राज्यापासून जळगाव महापालिकेत पक्षाची सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान राहिले आहे. शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याची पुन्हा एकदा कबुली त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मी चाळीस वर्षापासून पक्षाचे काम करत आहे. तर  तीस वर्षे भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहित आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिले काय आणि नाही दिले काय काहीएक फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहेष याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा.