ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून सोनाली कुलकर्णीने केली आर्थिक मदत

166
पुणे, दि.२९ (पीसीबी) – करोनामुळे भारतासह जगावर अभूतपूर्व संकट ओढवले आहे. महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग पहिल्या दोन आठवड्यात वेगानं पसरला. मात्र, सरकारने वेळीच कठोर पावले उचलल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचा उदरर्निवाहाची साधनं ठप्प झाली आहेत. त्यांच्या जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात असून, मदतीसाठी आवाहन केलं जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही खारीचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्यात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला राज्य सरकार तोंड देत आहे. सध्या लॉकडाउन असून, सगळ्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करता यावी, म्हणून सरकारने मदतीचे आवाहन केले होते. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुढे येत योगदान दिलं.
सोनाली कुलकर्णीने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून सांगितले. त्यानंतर सोनालीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे, माणसे आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही. कमी – जास्त, जे काही असेल, या लढ्यात माझा खारीचा वाटा आहे. गरजूंपर्यंत ही पोहचावी आणि त्याचे चांगले व्हावे अशी अपेक्षा,’ असे सोनालीने म्हटले आहे.

 

 

WhatsAppShare