जोरदार पाऊस

88

पिंपरी, दि. 31 (पीसीबी): पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या काही भागांत रविवारी (दि.31) जोरदार पाऊस झाला. सोबतीला गार वाराही होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर, काही ठिकाणी ऊनही पडले होते. त्यामुळे पुणेकरांना  वेगळे वातावरण आज पाहावयास मिळाले.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवणे-उत्तमनगर परिसरात जोरदार पाऊस झाला. वारजे-माळवाडी, कर्वेनगर भागांत हलकासा पाऊस झाला. नंतर एक तासाने ऊनही पडले. वाकड, हिंजवडी भागत आकाश काळवंडलेले होते.
दुपारी चारच्या सुमारास आणखी आकाशात ढग दाटून आले आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे आणखी पाऊस येणार असल्याचे चिन्हे आहेत. हवामान खात्याच्या वतीने पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारपासून जून महिन्याला सुरुवात होत आहे. आज मे अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात उन्हाळा कमी जाणवला. सकाळपासूनच कमालीचा उकाळा जाणवत होता.
यावर्षी केरळमध्ये लवकरच मान्सून येणार असल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दूरपर्यंत जोरात पाऊस सुरू असल्याचे चित्र दिसून आले. उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली होती. कोरोनामुळे घरातच बसून असलेल्या पुणेकरांना पावसाने थोडासा दिलासा दिला.

सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कोरोना नसलेल्या भागांत जोरदार पाऊस झाल्याने काही पुणेकरांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
जवळपास एक तास पुण्याच्या काही भागांत पाऊस झाला. सोबतीला गार वाराही होता. आभाळ भरून आल्याने पुणेकरांनाही दिलासा मिळाला. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते निसरडे झाले होते.

WhatsAppShare