जेष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

51

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे काल मुंबईत बोरीवली इथे वार्धक्याने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई आणि नातवंडे असं मोठं कुटुंब आहे. कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होते. सामंत यांच्या निधनाने कामगार चळवळीचा दुवा निखळला, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर दादा सामंत यांनी १९९७ ते २०११ पर्यंत कामगार आघाडी आणि संलग्न कामगार संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. १९८१ च्या गिरणी संपानंतर ग्वाल्हेर इथल्या गिरणीतली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्यासोबत कामगार चळवळीत सक्रीय कामगार कायद्याविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता. दादा सामंत यांच्या निधनामुळे, कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे नेतृत्व काळाच्या पडाद्याआड गेलं असल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
दादांचे नेतृत्व कौशल्य, संघर्षाची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा इतिहास अपूर्ण आहे. कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला आहे, असेही पवार म्हणाले.

डॉ. दत्ता सामंत यांच्या झुंजार नेतृत्वाला दादा सामंत यांनी समर्थ साथ दिली. राज्यातील कामगार चळवळ वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. डॉ. दत्ता सामंत यांच्यानंतर दादांनी कामगार चळवळीला नवी दिशा, समर्थ नेतृत्वं दिलं. महाराष्ट्रातील कामगार बांधव त्यांचं योगदान कायम स्मरणात ठेवतील. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दांत पवार यांनी शोक व्यक्त केला.

WhatsAppShare