जेएनयू विद्यार्थी संघावर ‘लेफ्ट युनिटी’चे निर्विवाद वर्चस्व; ‘अभाविप’चा दारूण पराभव

168

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ने निर्विवाद वर्चस्व मिळवले  आहे. विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या पदांवर ‘लेफ्ट युनिटी’ने विजय मिळवला.   अखिल भारतीय विद्यार्थी  परिषदेचा सर्व जागांवर दारूण पराभव झाला.  

तर, ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर आहे. विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी (दि. १४) मतदान झाले होते.  शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे मतमोजणी थांबवण्यात आली होती. मात्र, आज तणावपूर्ण परिस्थितीत येथे मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांचा एन. साई बालाजी हा विजयी झाला.   त्याने २१५१ मते घेऊन ११७९ मतांनी विजय मिळवला. तर उपाध्यक्षपदासाठीही डाव्या संघटनांच्या सरिका चौधरी यांनी २५९२ मते मिळवून तब्बल १५७९ मतांनी विजय मिळवला. महासचिवपदासाठी एजाज अहमद राथेर ११९३ मतांनी विजयी झाला.  तर संयुक्त सचिवपदावरही अमुथा जयदीपने २०४७ मते मिळवत विजय संपादन  केला.