जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद

221

दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर सोमवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने उमर या गोळीबारातून बचावला. आता या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. उमर खालिदवर हल्ला करणारा संशयीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विठ्ठलभाई पटेल रोडवरील सीसीटीव्हीमध्ये धावत असतानाचे हल्लेखोराचे छायाचित्र कैद झाले आहे. या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

या घटनेनंतर उमर खालिदने सांगितले की ‘आम्ही चहा घेऊन येत असताना मागून एक जण आला. त्याने मला ढकलून दिले आणि गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मी पळाल्याने वाचलो. हल्लेखोर तेथून पळून गेला. मी त्याचा चेहरा पाहू शकलो नाही. त्याच्याबरोबर कुणी इतर होते, की नाही ते माहीत नाही,’ अशी माहिती खालिद याने दिली. त्यानंतर, ‘ते मला घाबरवू शकत नाहीत, मी हे गौरी लंकेश यांच्याकडूनच शिकलोय अशी प्रतिक्रिया खालिदने दिली आहे.