जेईई अॅडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला

117

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेने घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. या आधीही जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवून तो देशात १८ वा आला होता. तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने यावर्षीच इयत्ता १२वीच्या परीक्षेत ९३.७ टक्के गुण मिळविले आहेत. कार्तिकेय अवघ्या १७ वर्षाचा असून त्याने जेईई अॅडव्हान्स परीक्षेत ३६० पैकी ३३७ गुण मिळविले आहेत. कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर असून आई पूनम गुप्ता या गृहिणी आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षा २७ मे रोजी झाली होती. या परीक्षेला देशभरातून २.४५ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://jeeadv.ac.in/

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कार्तिकेयने आनंद व्यक्त केला. निकाल चांगला लागेल हे माहीत होतं. पण देशातून पहिला येईल असे वाटले नव्हते, असे सांगतानाच विचारपूर्वक परीक्षेची तयारी केली आणि नियमित क्लासला जाण्याबरोबरच ६ ते ७ तासांचे शेड्यूल तयार करून अभ्यास केल्यानेच हे यश मिळाल्याचे कार्तिकेयने सांगितले.