जुलै अखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा आयुक्तांचा अंदाज

47

पिंपरी,दि.30 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रूग्ण संख्या तीन हजार पार झाली आहे. आज मंगळवारी (दि.30) दुपारी तीन वाजेपर्यंत 100 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 3007 झाली आहे. 10 मार्च ते 30 जून या 123 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे. रेडझोनमधून वगळल्यानंतर तब्बल 2742 नवीन रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार होईल असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. आता जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले.
शहराला कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

सर्वाधिक रुग्णवाढ पिंपरी भागातील जुन्या झोपडपट्यांमध्ये होत आहे. दापोडी, नेहरुनगर, विठ्ठलनगर, भाटनगर, बौद्धनगर, आनंदनगर, साईबाबानगर, अजंठानगर या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरातील पाच झोपडपट्यांमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. जवळपास दोन हजार रुग्ण झोपडपट्यांतील आहेत.
शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
मार्च, एप्रिल, मे अर्धा या अडीच महिन्यात शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर जाऊन पोहोचली होती. त्यातच 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले.
रेडझोनमधून वगळल्याने महापालिकेने विविध सुविधा सुरु केल्या. बाजारपेठा, दुकाने, कंपन्या सुरु करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी, नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. ही रुग्ण वाढ सुरुच आहे.

सात दिवसात एक हजार नवीन रुग्णांची वाढ
रेडझोनमधून वगळल्यानंतर तब्बल 2742 नवीन रुग्ण सापडले आहेत. 23 जूनला रुग्णसंख्या दोन हजार झाली होती. त्यांनतर अवघ्या सात दिवसात एक हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 3007 वर पोहोचली आहे.
आज दुपारी तीन वाजेपर्यंतच तब्बल 100 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे.

WhatsAppShare