जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

96

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी चिंचवडेनगर, चिंचवड येथील औदुंबर हाउसिंग सोसायटी येथे घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दादासाहेब वाघमारे (वय 45), त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या घरासमोर राहणारे आरोपी यांनी जून्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या सोसायटीतील महिला व पुरुषांना मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात भांडण सुरू झाले. आरोपींनी फिर्यादी यांच्या येथील महिलांना लाकडी दांडके, काठ्या, लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच दादासाहेब वाघमारे याने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

याच्या परस्पर विरोधात एका 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घरासमोर राहणाऱ्या आरोपी महिला यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादी, त्यांची बहीण आणि आईला काठीने व हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare