जुन्नरमध्ये वीज पडून घर कोसळल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आजी गंभीर जखमी

133

जुन्नर, दि. ११ (पीसीबी) – वीज पडून घर कोसळल्याने दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर त्यांची आजी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवार (दि.१०) सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील ओतूर तेलदरा येथे घडली.

कार्तिक गोरख केदार (वय २ वर्ष), वैष्णवी विलास भुतांबरे (वय ६, दोघेही रा. तेलदरा, ओतूर) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर चिमाबाई बापू केदार ( वय ६०) असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ओतूर परिसरात मुसळधार पावऊस सुरु होता. काही वेळातच पावसाने रौद्र रुप धारण केले आणि वादळासह विजा कडकडून लागल्या. या दरम्यान ओतूर परिसरातील तेलदरा वस्ती येथील ठाकर समाजाच्या आदीवासी वस्तीतील एका कच्च्या बांधकामाच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे घरा अक्षरक्ष: पत्त्यांप्रमाणे कोसळले. यावेळी घरामध्ये खेळत असलेले कार्तिक केदार आणि वैष्णवी भुतांबरे हे दोघे भिंतीखाली सापडून गंभीर जखमी झाले तर शेजारीच बसलेल्या आजी चिमाबाई केदार या देखील जखमी झाल्या. घर कोसळल्याच्या आवाजाने वस्तीवर राहणारे ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तिघांनाही तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र कार्तिक आणि वैष्णवी या दोघांचा मृत्यू झाला. तर आजी चिमाबाई यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्यातील रुग्णालायत पाठविण्यात आले आहे.