जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलिसांचा अद्याप पगार झालेला नाही मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे आणि पुर्ण पगार द्यावा- अॕड. आशिष शेलार

111

 

मुंबई, दि.७ (पीसीबी) – कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांचे पगार कपात केली जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले असले तरी अद्याप पोलीसांचे पगार झालेले नाहीत. ट्रेजरीकडे आलेली पे बिल 25% कपात करुन आल्याने पगार कपात करून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे पोलिसांना पुर्ण पगार द्या, अशी मागणी भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली आहे.

पोलिस खात्याकडून ट्रेझरी पाठवण्यात आलेली पे बिले ही २५% कपात करुन पाठविण्यात आली आहेत. याबाबत आमदार अँड आशिष शेलार यांना माहिती मिळताच त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एकतर अद्याप पोलिसांना पगार मिळालेले नाहीत आणि जे मिळतील ते २५% कपात करुन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

कोरोना आणि त्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत पोलीस आपला जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करीत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रशासकीय विलंब न करता व कपात न करता पोलीसांचे पुर्ण पगार तातडीने देण्यात यावेत, अशी विनंती आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली आहे.

WhatsAppShare