जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करा; मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन  

166

 नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारकरी पंढरपूरकडे जात असतात. वारी हा शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) केले. मोदींनी ४६ व्या मन की बातच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना संबोधित केले. दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात.

या कार्यक्रमात कोल्हापूरच्या एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मोदींनी पंढरपूरच्या वारीवर भाष्य केले. पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनी देशाला प्रेरणा दिली आहे.  त्यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धेविरुद्धच्या लढाईला बळ मिळत आहे. त्यामुळे  देशातील प्रत्येक नागरीकाने पंढरपूरच्या वारीला एकदातरी जावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.

यावेळी मोदींनी निसर्गावर प्रेमकरण्याचा आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेशही दिला. थायलंडमध्ये गुहेत अडकलेले फुटबॉलपटू आणि त्यांना वाचवण्याच्या मोहिमेचा उल्लेख आणि कौतुकही मोदींनी केले. काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या कवी नीरज यांनाही मोदींनी श्रद्धांजली वाहिली .

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याची भावना वाढीला लागली आहे. यावेळी आपण सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. प्रत्येक शहरात स्पर्धा व्हाव्या, बक्षिसांचे वाटप करण्यात यावे, असेही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावणाऱ्या खेळाडुंचे विशेष कौतुक केले. हिमा दास, योगेश कथुनियाजी, सुंदर सिंह गुर्जर या सर्वांचे मोदींनी अभिनंदन केले.