जीएसटी १० टक्क्यांनी कमी; फ्रिज, वॉशिंग मशिन्स स्वस्त होणार

149

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) रचनेमध्ये झालेल्या बदलांचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्यास सुरूवात होणार आहे. जीएसटी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला. या नव्या कररचनेची अमंलबजावणी आजपासून होत असून रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन्स व अन्य उपकरणांच्या किंमती ७ ते ८ टक्क्यांनी संकेत उत्पादकांनी दिले आहेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कर १० अंकांनी कमी झाल्याने उत्पादकांना कमी प्रमाणात कर भरावा लागणार असून पर्यायाने या वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेच्या करकपातीच्या निर्णयामुळे रेफ्रिजरेटर, लहान आकाराचे टीव्ही, वॉशिंग मशिन तसेच अन्य काही लहान उपकरणे स्वस्त होणार आहेत. याबाबत गोदरेज अप्लायन्सेसचे प्रमुख कमल नंदी म्हणाले की, ही करकपात गृहोपयोगी वस्तूंसाठी दिलासादायक ठरली आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन यांच्या किंमती कमी होणार असल्याने या बाजाराची व्याप्ती वाढेल व अधिक ग्राहक या वस्तू घेऊ शकतील. यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागणीतही प्रचंड वाढ होणे अपेक्षित असून सकल राष्ट्रीय उत्पन्नासाठीही ते लाभदायक ठरेल.