जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मिळवून देवू आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

236

पिंपरी, दि.३० (पीसीबी) – पुणे  जिल्हयातील हेरिटेज वास्तू  व  पर्यंटनस्थळांचे  सौंदर्य वाढवून  याठिकाणी  पर्यटन विकासाच्या संधी  उपलब्ध  होण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

येथील आयसीसी ट्रेड टॉवर येथे विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली  त्यावेळी ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, पुणे जिल्हयात शिवनेरी, सिंहगड, शनिवारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू व महत्वाची पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी  विविध उपक्रम राबवून त्यांचे जागतिक पातळीवर महत्व वाढविण्यासाठी  प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हयातील पर्यटन स्थळे व या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधांसाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर शासनाकडे सादर  करावा, जेणेकरुन निधीची तरतुद करणे सोयीचे होईल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हवा, पाणी आदी घटकांचे प्रदुषण रोखणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले, पुण्यात लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून ‘प्लॅस्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. सिंगल युज प्लॅस्टिक वापरास पूर्ण बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल, तथापी पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पाऊच याबरोबरच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापनावर भर द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प राबवावेत. पाणी प्रदुषण रोखण्यासाठी येथील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या स्वच्छतेवर भर देवून जायका प्रकल्प प्रभावीपणे राबवावा, तसेच  पर्यटन व पर्यावरण विषयक विकास कामांना गती द्यावी.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, जिल्हयातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तसेच मोठया ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मिळणे आवश्यक आहे. तसेच जिल्हयात प्लॅस्टिक पिशवी मुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आदि अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

WhatsAppShare