जिल्हा परिषदांवर प्रशासक येणार ?

181

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – जिल्हा परिषदेची (ZP) निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. खरे तर राज्य निवडणूक आयोगाने दोन महिन्यांपूर्वी गट व गणाची प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यावर काहीच निर्णय झाला नाही. त्यात विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 21 मार्च रोजी संपणारय. गेल्या पाच वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच निवडणूक आचारसंहिता लागली आणि 21 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मात्र, अजून प्रारूप रचनाही पूर्ण नाही. मग हरकती , त्यावरच्या सुनावणी आणि अंतिम रचना हे पाहता ही निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे समोर येत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांना मुदतवाढ द्यायची असेल, तर त्याचा निर्णय विधिमंडळात घ्यावा लागता. मात्र, आता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात होणार आहे. त्या अधिवेशनात तसा निर्णय घ्यावा लागेल. त्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवावा लागेल. मात्र, विधिमंडळ अधिवेशनाला अजून उशीर आहे. त्यापूर्वीच जिल्हा परिषदेची मुदत संपणार असल्याने सध्यातरी प्रशासक नेमण्याशिवाय कसलाही पर्याय सरकारसमोर दिसत नाही.

नाशिक जिल्हा परिषदेचा परीघ आता विस्तारणार असून, गट चक्क 11 आणि गण 22 ने वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राजकारणात पाय ठेवायला संधीही जास्त राहणार आहे. नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. मात्र, या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 ते 40 लाखांच्या घरात लोकसंख्या आहे. हे पाहता राज्य सरकारने महापालिकेच्या जागा वाढवल्या. महापालिकेत सध्या 122 नगरसेवक होते. आता त्यांची संख्या 133 अशी करण्यात आली. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या जागाही वाढवण्यात येत आहेत.

नाशिक शहरी भागासाठी 2 महापालिका, 8 नगरपालिका, 7 नगरपंचायती आहेत. मात्र, ग्रामीण भागाचा गावगाडा एकट्या जिल्हा परिषदेवर सुरू असतो. ग्रामीण भागात 2011 मधील जनगणनेनुसार 34 लाख 99 हजार 792 लोकसंख्या होती. त्यात साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या नाशिक जिल्हा परिषदेत सध्या 76 गट आणि 146 गण आहेत.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांची निवडणूक होते. एका गटात दोन गण असतात. या दोन्ही निवडणुकांना वेगवेगळे मतदान करावे लागते. जिल्ह्यात ओझरची ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे आपसुकच हा गट येणाऱ्या काळात रद्द होईल.