जितेंद्र वाघ यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

77

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी जितेंद्र वाघ यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून वाघ यांची पिंपरीच्या अतिरिक्त आयुक्तपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत. दरम्यान, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार (दोन) यांना 7 एप्रिल 21 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी महापालिकेला तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

प्रतिनियुक्तीवरील विकास ढाकणे हे अतिरिक्त आयुक्त आहेत. तर, महापालिका सेवेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेल्या अतिरिक्त आयुक्त (तीन) या पदाचा अतिरिक्त पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार (दोन) यांना 7 एप्रिल 21 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून सहा महिने राज्य सेवेतील अतिरिक्त आयुक्त (दोन) हे पद रिक्त होते.

अखेर सहा महिन्यांनी महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. शासनाने राज्याच्या महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ यांची 17 सप्टेंबर रोजी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक केली असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. दरम्यान, “नगरविकास विभागाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू होणार असल्याचे” अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

WhatsAppShare