जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा कमी केल्याबद्दल धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

600

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे एटीएसच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यानंतरही त्यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

आव्हाडांच्या खुनाच्या कटात सरकारचे संगनमत आहे काय? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करवी, यासंदर्भात मी यापूर्वीही तुम्हाला विनंती केली होती. त्यांच्या घराची रेकी झाल्याचेही सांगितले. तरीही काही महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली. सुरक्षाव्यवस्था कमी करताना राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल विचारात घेतला जातो. एकीकडे एटीएसने न्यायालयात आव्हाड हिटलिस्टवर असल्याचे सांगूनही गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

एक विधानसभा सदस्या म्हणून साधी चौकशी करण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. सगळ्याच घटना पाहता सरकारच्या उद्देशाबाबत संशय निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आव्हाड यांच्या जीवाचे काही बरं-वाईट झाले, तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, याकडे मी तुमचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत, ही विनंती.