“जास्मिन वानखेडे यांच्यावर यापुढे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही”; खोपकरांचा थेट इशारा

82

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन आता जोरदार राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यापुढे जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिलाय.

महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचंही खोपकर यांनी आवर्जुन सांगितलं. त्याचबरोबर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरच्या पाठीशीही मनसे उभी आहे, असंही खोपकर यांनी स्पष्ट केलंय.

आम्हाला समीर वानखेडे यांचाही अभिमान आहे. ड्रग्स विरोधात काम करणाऱ्या समीन वानखेडेच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. जाम्सिन वानखेडे यांच्यावर यापुढे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे ज्या-ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असं आव्हानच खोपकर यांनी दिलं आहे.

यास्मिन वानखेडे चार वर्षापासून आमच्यासोबत काम करतात. गेल्या चार वर्षात कुणी जास्मिन वानखेडेंबाबत बोललं नाही. तुम्ही खेट मनसे चित्रपट सेनेवर खंडणीचे आरोप करत आहात. त्यातही एका महिलेवर गंभीर आरोप करत आहात. आम्ही ठामपणे जास्मिन वानखेडे यांच्यासोबत आहोत. फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे पदाधिकारी चित्रपटाच्या सेटवर जाऊन काय करतात हे पुढे आणू , असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिलाय.

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

WhatsAppShare