‘जानकर, आणखी किती लाचारी करणार ? – अजित पवार

58

नागपूर, दि. ६ (पीसीबी) – राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पाया पडतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर ‘जानकर, आता आणखी किती लाचारी करणार’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीकेची झोड उठवली.  

नागपूर येथे विधानभवनाच्या परिसरात जानकर रावसाहेब दानवे यांच्या पाया पडले. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी जानकर यांच्यावर टीका केली. जानकर यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जानकर यांचा  स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष असून त्या पक्षाचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. मात्र,  आमदारकीसाठी त्यांना भाजप अध्यक्षांच्या  पाया पडावे लागले, अशी टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, जानकर यांना भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली असली, तरी त्यांनी थेट भाजपच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे टाळून राष्ट्रीय समाज पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तसेच जानकर यांनी दानवे यांच्या पाया पडल्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. दानवे हे ज्येष्ठ नेते असून ते आपल्याला वडीलासमान आहेत. त्यामुळे त्यांच्या पाया पडणे गैर काय ? असे जानकर यांनी म्हटले आहे.