जागा वाटपांचा कुठलाही फॉर्म्युला काँग्रेसला दिलेला नाही – जयंत पाटील  

160

नागपूर, दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा अद्याप कुठलाही फॉर्म्युला काँग्रेसला देण्यात आलेला नाही. आघाडीची चर्चा सध्या केंद्रीय पातळीवरच सुरू आहे. राज्यात अद्याप यावर चर्चाही झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली.

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून जागावाटपाचा ५०-५० चा फॉर्म्युला देण्यात आल्याचा  दावा खोटा आहे. आघाडीची चर्चा केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातच सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातही एकत्र बसून जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे.

पाटील पुढे म्हणाले की, राज्यात शंभर टक्के सत्ता परिवर्तन होईल. सध्या पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दरवाढीमुळे लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल शंभर रुपये लिटर दरावर नेण्याचा विक्रमही मोदी करतील, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यापारी आघाडीचे प्रमुख धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे धोरणच नाही. एकीकडे ते सरकारच्या विरोधात टीका करतात, तर दुसरीकडे ते मंडळ व महामंडळावरील पदेही स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असेही पाटील म्हणाले.