जळगावात भाजपला फटका; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत खासदार रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज बाद कारण…

124

जळगाव, दि.२१ (पीसीबी) : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचं दिसत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

WhatsAppShare