जळगावातील तरुणाला एटीएसने घेतले ताब्यात

222

जळगाव, दि. ७ (पीसीबी) – राज्य एटीएसच्या पथकाने गुरुवारी (दि.६) दुपारच्या सुमारास जळगाव येथील यावल तालुक्यातील साकळी येथून एका तरुणाल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एटीएसने त्याचे घर सील केले असून त्यांच्या घराची झडती घेतली असता तेथे सनातनशी संबंधित काही कागदपत्रे, सीडी त्यांना आढळल्या आहेत.

वासुदेव सुर्यवंशी  (वय २८) असे  चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, वासुदेव हा कर्की (ता.मुक्ताईनगर) येथील मूळ रहिवासी असून तो सध्या साकळी येथे मामाच्या गावी राहत होता.  वासुदेव हा सनातनचा साधक असल्याची चर्चा आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास गावात दोन वाहनांद्वारे दाखल झालेल्या एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. यानंतर एका वाहनात वासुदेवला बसवून पथक नाशिककडे निघाले, तर दुसऱ्या वाहनातील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याचे घर बंद करून अडीच तास झाडाझडती घेतली. त्यात सनातनशी संबंधित काही कागदपत्रे, सीडी त्यांना आढळल्या.

दरम्यान, वासूदेव हा गॅरेजचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. या कारवाईविषयी गोपनीयता पाळत एटीएसच्या पथकाने कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला.