जर मला कोणी ट्रोल केले तर… याच पुरस्काराने एकेकाला मारेन- राखी सावंत

111

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – आयटम गर्ल राखी सावंत तिच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. राखीने केलेल्या प्रत्येक विधानानंतर तिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. इतकेच नाही तर अनेक वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावे लागले. दरवेळेप्रमाणे आताही राखीवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यावेळी कोणत्याही वक्तव्यामुळे नाही तर तिला चक्क पुरस्कार मिळाल्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे.

राखी सावंतला नुकतेच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यामध्ये राखीला ‘बेस्ट आयटम नंबर डान्सर’ यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राखीला पुरस्कार मिळाल्यानंतर काहींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच ट्रोल केले. इतकेच नाही तर तिच्या पुरस्कारावरही काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परंतु या साऱ्यांना राखीने चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर याप्रसंगाचे काही फोटो राखीने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिलाच चांगलेच ट्रोल केले. “राखी तू हा पुरस्कार विकत घेतलास का?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला. युजर्सच्या या प्रश्नावर राखी चांगलीच भडकली असून तिने या नेटकऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे.

“दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कारासाठी मी पात्र आहे. त्यामुळेच मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जर मला कोणी ट्रोल केले तर आता याच पुरस्काराने एकेकाला मारेन”, असे राखी यावेळी म्हणाली.