जयललितांप्रमाणे करुणानिधी यांच्यावरही मरीना बीचवर अंत्यसंस्कार व्हावे – राहुल गांधी

108

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – द्रविड राजकारणाचे प्रमुख आणि पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे एम करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार यावरुन वाद सुरू आहे. करुणानिधी यांच्यावर मरीना बिचवर अंत्यसंस्कार करण्यात येण्याची मागणी त्यांच्या समर्थकांसह नातेवाईकांनी केली आहे. मात्र, त्याला राज्य सरकारने विरोध केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे करुणानिधींच्या नातेवाईकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रात्री उशीरा राज्य सरकारने युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितल्याने आता सकाळी ८ वाजता या वादावर सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बिचवर जागा मिळावी अशी मागणी केली आहे.

दिवंगत नेत्या जयललीता यांच्याप्रमाणेच करुणानिधी हे देखील लोकनेते होते, त्यांनीही नेहमीच तामिळी जनतेचे प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांच्यावरही मरीना बिचवर अंत्यसंस्कार व्हायला हवेत. शोकाकुल परिस्थितीत तेथील राज्यकर्ते दिलदारपणा दाखवतील अशी मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विटरवरद्वारे दिली आहे.