जम्मू-काश्मीर सरकार अल्पमतात; भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला

588

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपने आज (मंगळवार) जाहीर केला. भाजपचे नेते राम माधव यांनी दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे.

भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याने जम्मू काश्मीरमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते. आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भाजप नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीनंतर पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या मेहबुबा मुफ्ती संध्याकाळी राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.