जम्मू-काश्मीरमध्ये नवी राजकीय समीकरणे; पीडीपी-काँग्रेस सरकार स्थापणार ?

65

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी हालचालींना पुन्हा वेग आला आहे. पीडीपी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक आयोजित केल्याचे सांगितले जात आहे.  

भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सध्या राज्यपाल राजवट लागू  आहे. सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांची आवश्यकता असून पीडीपीकडे २८ तर काँग्रेसकडे १२ आमदार आहेत. बहुमतासाठी ४ जागा कमी पडत आहेत. दरम्यान, ३ अपक्ष व माकप आणि जेकेडीएफच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा या आघाडीला मिळणार असल्याचे वृत्त आहे.

याबाबत काँग्रेस नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अंबिका सोनी, करण सिंग आणि पी. चिदंबरम या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीत पीडीपीसोबत आघाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पीडीपीसोबत आघाडीची शक्यता फेटाळली होती.