जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; सुरक्षारक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

24

श्रीनगर, दि. २२ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षारक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. स्थानिक पोलीस कर्मचारी मोहम्मद सलीम यांचे अपहरण करुन हत्या करणारे हेच दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापही ही शोधमोहिम सुरुच आहे.

कुलगामच्या खुदवानी भागातील वानी भागात ही कारवाई सुरु आहे. काही वेळापूर्वी येथे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. मात्र, सध्याची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या चकमकीपूर्वी हा भाग पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता. या भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहीती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षारक्षकांनी या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये गोळीबार सुरु झाला, यात तीन दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, शनिवारी काही दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका जवानाचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. सुट्टीवर घरी निघालेल्या जम्मू-काश्मीर पोलिसांमधील कान्स्टेबल सलीम शाह दक्षिण काश्मीरच्या कुलगामचेच रहिवासी होते. यापूर्वी औरंगजेब या जवानाच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घुण हत्येनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता.