जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

34

श्रीनगर, दि. ४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील किलुरा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक उडाली. यात ५ दहशतवाद्यांचा खातमा झाला . हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत. सुरक्षा दलाने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत आज (शनिवार) ही कारवाई करण्यात आली.  दरम्यान, गेल्या ७२ तासांतच ९ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.

किलुरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती  सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर  जवानांनी शुक्रवारी रात्रीच या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यावेळी दशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याने त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी ५ दहशतवाद्यांना यमसदनी  पाठवले. अद्यापही किलुरामध्ये दहशतवादी आणि जवानांदरम्यान चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, किलुरामध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटलेली आहे. उमर मलिक असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.