जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा- सर्वोच्च न्यायालय

72

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – देशभरात मुले पळवणाऱ्या टोळीच्या किंवा गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाकडून निष्पापांची हत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही या घटनांवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहे.

गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाकडून झालेल्या मारहाणींसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भविष्यात जमावाने हत्या केल्याची घटना पुन्हा घडू नये, यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, असे कोर्टाने सांगितले. केंद्र व राज्य सरकारने या घटना रोखण्यासाठी काय पावले उचललीत, यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे.

सरकार हिंसेला परवानगी देऊ शकत नाही. जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी संसदेने नवीन कायदा करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.